आ. मीनाक्षी पाटील यांनी केली विहूर धरणाची पाहणी Print

मुरुड, ५ नोव्हेंबर
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार मीनाक्षी पाटील यांनी आज तातडीने विहूर धरणास भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व सदस्य पंडित पाटीलही उपस्थित होते. विहूर धरणातील गेट वॉल नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ऐन हिवाळ्यात चार ग्रामपंचायतींमधील सुमारे २० हजार लोकांना पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे.
या अनुषंगाने आज आमदारांनी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली. या वेळी पंडित पाटील यांनी या ठिकाणी उद्भवाच्या ठिकाणी विहीर बांधून तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.
या विहिरीतून सदरचे पाणी पंपाद्वारे पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले, तसेच आमदार मीनाक्षी पाटील यांनी तहसीलदारांना टँकर पुरविण्याचेही आदेश दिले. यापुढे विहूर धरणावर दोन व्यक्तींची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच जलसंधारण सभेत झाल्याने येथे दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले. शाखा अभियंता माळी यांनी सदरची विहीर शिवकालीन योजनेतून होणार असल्याचे सांगितले. या वेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील, चिटणीस मनोज भगत, सभापती अपर्णा सुर्वे, सरपंच सविता बांद्रे, कृष्णा अंबाजी, सुनील गोसावी, उपसरपंच अस्लम हालडे, रमेश दिवेकर, महेश कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते.