कुरुळ पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे Print

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पवित्र्यात
अलिबाग, ५ नोव्हेंबर
कुरुळ ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येणारी पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका उपतालुकाध्यक्ष धनंजय म्हात्रे यांनी केला आहे. याप्रकरणी म्हात्रे यांनी कुरुळ ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे. पेयजल योजनेंतर्गत कुरुळ ग्रामपंचायत हद्दीतील पठार व उद्यमनगर येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. या टाक्यांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारची तांत्रिक मदत घेतली जात नसून, टाकीचे कॉलम झुकलेले असल्याचा आरोप धनंजय म्हात्रे यांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून, याबाबत ग्रामपंचायतीने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायतीविरोधात जनआंदोलन छेडेल, असा इशारा धनंजय म्हात्रे यांनी दिला आहे.