खांडबहालेंच्या भारतीय भाषा शब्दकोश संकेतस्थळाची कोटीच्या कोटी उड्डाणे Print

प्रतिनिधी , नाशिक
इंटनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये भारतीय कंपन्याही दिसू लागल्या असून भारतीय भाषांचा शब्दकोष म्हणून ज्याचा गौरव होतो, त्या www.khandbahale.com या भारतीय संकेतस्थळाने प्रतिमहिना एक कोटी हिट््सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. मागील महिन्यात ही संख्या ९६ लाख ६६ हजार होती तर ऑक्टोबर महिन्याचा अखेरचा दिवस बाकी असताना एक कोटी २२ लाख भेटींची नोंद करण्यात आली. भारतीय प्रादेशिक भाषांच्या आदानप्रदानासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकेतस्थळाला जगभरातून दररोज लाखो लोक भेट देत असतात. भाषातज्ज्ञ, भाषांतरकार, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हे संकेतस्थळ लोकप्रिय आहे. गुगलसारख्या सर्च इंजिनने आपणहून या संकेतस्थळाचे एकूण ५३ लाख ५० हजार पानांचे सूचीकरण आपल्या संग्रहात करून घेतले आहे. मायक्रोसॉफ्टने ‘भारतीय भाषा उद्योगप्रमुख’ म्हणून या संकेतस्थळाचा गौरव केला आहे. मराठीसह, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामीळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली, संस्कृत अशा विविध भाषांमधील ४० लाखांहून अधिक शब्दसंग्रह असलेले शब्दकोश या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे शब्दकोश सर्वासाठी मोफत आहेत. तसेच मोबाइल टॅब्लेट्सवरही हे शब्दकोश डाऊनलोड करता येतात.
अनेक परदेशी कंपन्यांकडून येणारे प्रस्ताव धुडकावत नाशिकमधील सुनील खांडबहाले यांनी हे संकेतस्थळ स्वबळावर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आज या संकेतस्थळाचे १५० देशांमध्ये सहा कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. कुठल्या देशातून किती लोक भेटी देतात, कोणत्या दिवशी कोणत्या वेळी ही संख्या कमी-अधिक होते, अशी आकडेवारी नोंदविणारी सांख्यिकी प्रणाली या संकेतस्थळावर कार्यरत आहे. तब्बल १५ ते २० टक्के वापरकर्ते हे अभारतीय आहेत. भारतीय भाषांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. आज अनेक परदेशी गुंतवणूकदार भारतीय सौहार्द वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. भारतीय तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे या संकेतस्थळाच्या खांडबहाले डॉट कॉमच्या उदाहरणावरून पुन्हा एकटा स्पष्ट झाले आहे.