श्री विठ्ठल कोपरपाडा, दिलखुश आवासला विजेतेपद Print

जिल्हा निवड चाचणी कबड्डी
प्रतिनिधी, अलिबाग   
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात भैरवनाथ पेझारी संघावर एकतर्फी मात करीत श्री विठ्ठल कोपरपाडा संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये दिलखुश आवास संघाने स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाचा पराभव करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.
चेंढरे सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयोजनाखाली ही स्पर्धा खेळविण्यात आली. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पहिला डाव अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत भैरवनाथ पेझारी संघाने १ गुणाची आघाडी घेतली होती. त्यामुळे बाजी कोण मारणार, याबाबत कबड्डीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र दुसऱ्या डावात श्री विठ्ठल कोपरपाडा संघाच्या सचिन पाटील व शशांक पाटील यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला १५-५ असा ९ गुणांनी विजय मिळवून दिला. भैरवनाथ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीत श्री विठ्ठल कोपरपाडा संघाने विनायक दिवलांग संघाचा ८-६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत भैरवनाथ पेझारीने जय हनुमान उंडरगाव संघावर २३-४ अशी मात केली.
महिला गटात दिलखुश आवास संघाने स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. पहिल्या डावात आवास संघाकडे ७ गुणांची आघाडी होती. दुसऱ्या डावात स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाच्या खेळाडूंनी सामना आपल्या बाजूने झुकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु तो असफल ठरला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर दिलखुश आवास संघाने २७-२० असा सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले. आवासच्या पूनम म्हात्रे, विशाखा म्हात्रे, राधिका म्हात्रे, प्रतीक्षा मोकल यांनी चांगला खेळ केला. दिलखुश आवास संघाने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. स. रा. तेंडुलकर विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. त्यांच्या पूजा पाटील व निकिता पाटील चमकल्या.
उपांत्य फेरीत दिलखुश आवासने कर्जत स्पोर्टस् क्लबवर ४७-१७ अशी मात केली, तर तेंडुलकर हायस्कूलने भिलेश्वर किहीम संघाचा ५२-३८ असा पराभव केला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष जनार्दन (बाळूशेठ) पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शिनी पाटील, चेंढरे सरपंच संगीता धनवट, उपसरपंच मीनाक्षी देशमुख, माजी सरपंच राम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले. पुरुष गटातील विजेत्या श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला कोपरपाडा गावकीतर्फे २५ हजारांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.