सिंधुदुर्गातील पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल Print

सावंतवाडी, ५ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्य़ातील अनेक भागांत या पावसाचे आगमन झाले असल्याने बागायतदार शेतकरी वर्गाची धावपळ उडाली.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांत पावसाच्या आगमनाने भातशेती, आंबा व काजू बागायतदार त्रस्त झाले आहेत.
थंडीची चाहूल सुरू झाली असतानाच अचानक पावसाचे आगमन होताच अधूनमधून हवामानातील बदल बागायतींना धोक्याचा ठरत आहे.
आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने बागायतदार शेतकऱ्यांची धांदल उडाली.
या हंगामात भातकापणी व मळणी करण्यात शेतकरी गुंतला असतानाच आज दुपारनंतर पावसाचे वाजत-गाजत आगमन झाले. आंबा बागायतदार चिंताग्रस्त असून, आंबा कलमांना पालवी फुटल्याने आंबा पीक उशिरा येण्याची भीती त्यांना आहे.
गेल्या काही वर्षांत ऋतुमानातील हा बदल शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जाण्यास भाग पाडत आहे. भातशेती, आंबा, काजू, कोकम बागायतीला मोठा फटका बसणाऱ्या या पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सध्या उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंचे दर्शन शेतकरीवर्गाला घडत आहे त्यामुळे लोकांना तापाचा आजारही त्रस्त करून सोडत आहे.