कोल्हापूर खंडपीठाच्या आंदोलनाला वकील संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Print

सावंतवाडी, ५ नोव्हेंबर
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून सहा जिल्ह्य़ांतील वकील संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनास  सिंधुदुर्ग  जिल्ह्य़ातील वकिलांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. आज वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग दर्शविला नाही, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड्. दिलीप नार्वेकर यांनी बोलताना सांगितले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर ५, ६ व ७ नोव्हेंबर रोजी सहभाग दर्शवू नये, असा कोल्हापूर बार असोसिएशनने ठराव घेतला. त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व वकिलांनी कोल्हापूर खंडपीठ व्हावे म्हणून आंदोलनास पाठिंबा दर्शविला. न्यायालयीन कामकाजात अनुपस्थित राहतानाच न्यायालयाला आंदोलनाची कल्पना दिली. हे आंदोलन आजपासून सुरू झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वकील संघटना जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देतील. त्या  निवेदनातून कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा देतील. या आंदोलनात जिल्ह्य़ातील सर्व वकिलांनी पाठिंबा दर्शविला आहे, असे अ‍ॅड्. नार्वेकर म्हणाले. येथील तालुका वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी बसून या आंदोलनाची चर्चा केली. न्यायालयीन कामकाजात सहभाग होणार नाही, असे सांगितले असल्याचे अ‍ॅड्. नार्वेकर यांनी स्पष्ट केले.