जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांना अपात्र ठरवा - राजेंद्र पाटील Print

प्रतिनिधी, अलिबाग  
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांना अपात्र ठरवा, अशी मागणी काँग्रेस प्रतोद राजेंद्र पाटील यांनी केली आहे. ते अलिबाग इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलीप भोईर हे गेल्या दीड महिन्यांपासून कुठल्याही कारणाशिवाय बेपत्ता आहेत. आपल्या रजेचा स्थायी समितीला अर्जही त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी पाटील यांनी केली.
जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ८५ आणि ८९ नुसार समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या गीता जाधव आणि काँग्रेस प्रतोद राजेंद्र पाटील यांनी केली आहे. नियमानुसार जर जिल्हा परिषदेचे सभापती ३० दिवसांपेक्षा अधिक काळ जर आपल्या पदावरून गैरहजर असतील तर त्यांना अपात्र ठरवता येऊ शकते. दिलीप भोईर हे गेल्या दीड महिन्यापासून कुठल्याही कारणाशिवाय जिल्हा परिषदेत फिरकलेले नाही. त्यांनी आपल्या रजेचा अर्ज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे पाठवलेला नाही अथवा आपल्या पदाचा पदभार त्यांनी कोणाला दिला नाही. आजही समाजकल्याण समितीच्या बैठकीत ते आले नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले जावे, अशी मागणी आता काँग्रेस प्रतोद राजेंद्र जाधव यांनी केली.
सभापती बेपत्ता असल्याने जिल्हय़ातील दलित वस्ती सुधार कार्यक्रम, आदिवासी विकास कार्यक्रम आणि अपंग कल्याण कार्यक्रमांतर्गत अनेक योजनांची काम रखडल्याचा आरोपही पाटील यांनी केला. त्यामुळे समाजकल्याण विभागात सगळे काही आलबेल असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची बैठक आज जिल्हा परिषदेत पार पडली. दिलीप भोईर यांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांची हंगामी सभापती म्हणून काम पाहिले.