रायगड जिल्हा परिषद बरखास्त करा - श्याम भोकरे Print

जलंसधारण समितीची बैठक १० मिनिटांत गुंडाळली
प्रतिनिधी, अलिबाग  
रायगड जिल्हा परिषदेचा कारभार लोकशाहीला धरून राहिलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांनी केली आहे. ते अलिबाग इथे पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची सभा आज अलिबाग इथे आयोजित करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड यांनी ही सभा १० मिनिटांत गुंडाळली. सभेच्या इतिवृत्तावर आपल्याला आक्षेप असल्याचे जलसंधारण समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते श्याम भोकरे यांनी केला होता. मात्र श्याम भोकरे यांना अध्यक्षांनी बोलू दिले नाही. आणि ही सभा आता संपली आहे, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. जलसंधारण समितीचे सदस्य असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांना सभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोपही श्याम भोकरे यांनी केला आहे.
बहुमताच्या जोरावर आता सत्ताधिकारी शेकाप-सेना युती मनमानी कारभार करायला लागले असल्याचे भोकरे यांनी सांगितले. जलसंधारण समितीच्या बैठकीत जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा योजना, शिवकालीन बंधारे योजना, शाळांच्या शौचालयाचे बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या योजना मंजूर होत असतात. मात्र अशा महत्त्वाच्या बैठका जर १० मिनिटात गुंडाळल्या जात असतील तर कामकाज चालणार कसे, असा सवाल भोकरे यांनी केला. आज दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी पाणी-प्रश्न जटिल झाला आहे. अशा वेळी जर सत्तारूढ पक्ष द्वेषाचे राजकारण करणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल त्यांनी केला.
 आजच्या बैठकीत जलसंधारण समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी बैठकीत आमचे बहुमत आहे, त्यामुळे सभा आम्हाला पाहिजे तशीच चालेल असे घोषित केल्याचे भोकरे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद आता लोकशाहीला धरून राहिली नाही, ती बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालकमंत्री सुनील तटकरे यांची भेट घेऊन तसे निवेदन त्यांना देणार असल्याचे भोकरे यांनी स्पष्ट केले. या वेळी जलसंधारण समितीच्या काँग्रेस सदस्या अपर्णा जाधवदेखील उपस्थित होत्या. महाड-पोलादपूरवरून अलिबागला येऊन जर विषय समित्यांच्या बैठका दहा मिनिटांत संपणार असतील तर त्या बैठकांचा काय उपयोग, असा सवाल जाधव यांनी केला. तर आजच्या जलसंधारण समितीच्या सभेला पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कोळी गैरहजर कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी केला.