औंढय़ात काविळीचे दोनशेवर रुग्ण Print

वार्ताहर, हिंगोली
अशुद्ध पाण्यामुळे औंढा नागनाथ व परिसरातील अनेक गावांत काविळीची साथ पसरली आहे. शहरातील रुग्णालयांत जवळपास २०० पेक्षा जास्त काविळीने त्रस्त रुग्ण सध्या दाखल आहेत. म्हाळसगाव व निशाणा या गावांतील दोघांचा काविळीने मृत्यू झाल्याची चर्चा सुरू होताच जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी औंढय़ाला भेट देऊन पथकांद्वारे रुग्णांची पाहणी केली.
औंढय़ात अशुद्ध पाण्यामुळे काविळीची साथ पसरल्याची कबुली बोल्टे यांनी दिली. पाच आरोग्य पथके स्थापना करून शहरातील रुग्णांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ब्लिचिंग पावडरमध्ये ३३ ते ३४ टक्के क्लोरीन असणे गरजेचे असते. परंतु वापरलेल्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण १५.४७ टक्के आढळून आले. तसेच मंदिर परिसरातील घाण व जवळच्या तलावाचा पाझर, हातपंपांत येत असल्याने या अशुद्ध पाण्यामुळे ही लागण झाली. आता सर्व हातपंपांमध्ये नवीन ब्लिचिंग पावडर टाकली आहे. म्हाळसगाव येथील मंजाजी आखरे व निशाणा येथे रंगनाथ सावळे यांचा काविळीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, खरे कारण अजून समजले नाही. आसोंदा येथे काविळीचे २५, तर म्हाळसगाव येथे ३ ते ४ रुग्ण आढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.