विदेशी पर्यटकांच्या भारतातील पसंतीक्रमात बिहारची बाजी Print

गोव्यालाही मागे टाकले
विक्रम हरकरे, नागपूर
बिहारमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाली असून भारतात येणाऱ्या दर सहा पर्यटकांपैकी एक पर्यटक बिहारला भेट देत असल्याचे एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पर्यटनात आघाडीवर असलेल्या देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांच्या तुलनेत बिहार सातव्या क्रमांकावर आहे.
स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांची नैसर्गिक देणगी लाभलेला गोवा विदेशी पर्यटकांचा भारतातील ‘हॉट स्पॉट’ समजला जात असला तरी बिहारने अलीकडे गोव्याला मागे टाकल्याने पर्यटन अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का बसला. बिहारचे आतिथ्य आता विदेशी पर्यटकांना आवडू लागल्याचेच हे प्रमाण समजले जाते. यावर्षी आतापर्यंत ८ लाख ४० हजार विदेशी पर्यटकांनी बिहारला भेट दिली असून वर्षांअखेर हा आकडा १० लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सकारात्मक बदल असून पूर्वीच्या तुलनेत विदेशी पर्यटक दहा पटींनी वाढल्याचे चित्र आहे. बिहारमधील बोधगया, नालंदा आणि वैशाली ही प्राचीन स्थळे विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने मोठी आकर्षण आहेत. गुंडागर्दीने बदनाम झालेल्या बिहार राज्यात असुरक्षिततेची टांगती तलवार असल्याने देशी-विदेशी पर्यटकांनी बिहारकडे पाठ फिरवली होती. यात आता बदल घडला आहे.
मॉरिशसमध्ये गेल्या महिन्यात झालेला आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेच्या निमित्ताने बिहार सरकारने मॉरिशसला मोठा रोड शो आयोजित करून बिहारमधील पर्यटन स्थळांचे जबरदस्त मार्केटिंग केले. महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्याने यासाठी पुढाकार घेतलेला नाही. ५-८ नोव्हेंबर दरम्यान लंडन येथे होत असलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मीट - २०१२ च्या निमित्ताने भारत सरकारने ९ पॅव्हेलियन बुक केले आहेत. त्यापैकी एक बिहारला देण्यात आला आहे. भारताचे नवे पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विदेशी पर्यटकांचा ओघ वाढविण्याचे नवे लक्ष्य निर्धारित केले आहे. चित्रपटांचे ग्लॅमर लाभलेले चिरंजीव लोकप्रिय अभिनेते असल्याने भारतीय पर्यटनाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याचे विधान पंतप्रधानांनी केले होते. देशातील पर्यटनाचा पुरेपूर वापर होत नसल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले आहे. विदेशी पर्यटकांचा ओघ १ टक्का जरी वाढला तरी देशातील अडीच कोटी लोकांना नवा रोजगार उपलब्ध होणार आहे.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भर टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याच्या ६.५ टक्क्यांचा वाटा १० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारतात देशी-विदेशी चित्रपटांचे चित्रीकरण करणे अत्यंत अवघड असल्याचे आजवरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याने चिरंजीवी यांनी चित्रिकरणावर कायद्याच्या आडोशाने लादलेले अनेक र्निबध खुले करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते.