नारायणकाका ढेकणेमहाराज यांचे निधनं Print

प्रतिनिधी, पुणे

सिद्धयोगाचा प्रचार आणि प्रसार यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू नारायणकाका ढेकणेमहाराज (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री निधन झाले. ते नाशिक येथील सिद्ध महायोग आश्रमाचे संस्थापक-अध्यक्ष आणि गुळवणीमहाराज यांच्या पुण्यातील वासुदेव निवास ट्रस्टचे पीठाधीश्वर होते.नारायणकाकांचा जन्म ३ जुलै १९२७ रोजी धुळे येथे झाला.

बी. एस्सी, बी. ई., एम. ई. या पदव्यांनंतर नारायणकाकांनी अभियांत्रिकी विषयात पीएच डी संपादन केली. सद्गुरू लोकनाथतीर्थ स्वामीमहाराज यांच्याकडून त्यांना शक्तिपाताची दीक्षा मिळाली. साधना सुरू असतानाच त्यांना गुरुबंधू योगीराज गुळवणी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी सिद्धयोगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले जीवन व्यतीत केले.  नारायणकाकांचे पार्थिव मंगळवारी (६ नोव्हेंबर) दुपारी  चारनंतर नाशिक येथील सिद्ध महायोग आश्रम येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून बुधवारी दुपारी नाशिकमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.