टिप्पर गँगच्या म्होरक्यांना ‘मोक्का’ Print

प्रतिनिधी
नाशिक
शहरातील सिडको परिसरात घरफोडी, वाहन जाळपोळ, लूट, सोनसाखळी चोरी, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टिप्पर गँगच्या पाच गुन्हेगारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोत एका बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करीत भरदिवसा तब्बल एक कोटीची रोकड लंपास करण्यात आली होती. या लूटमध्ये टिप्परच्या म्होरक्यांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या टोळीच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांसह पोलीसही हैराण झाले आहेत. या टोळीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे. त्यात टिप्परचे गणेश वाघ, नागेश सोनवणे, समीर पठाण, नितीन काळे आणि सुनील अनारसे यांचा समावेश आहे.