केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हर्षद बेळेचे यश Print

प्रतिनिधी
नाशिक
नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील हर्षद बेळे याने देशाच्या क्रमवारीत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळविला असून देशातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचा क्रमांक १८० वा आहे उद्योग क्षेत्रातील कौटुंबिक वारसा असताना लहानपणापासून लोकसेवा करण्याची आवड असल्याने सामाजिक क्षेत्रातील कामातही हर्षदने चांगले काम केले आहे. आयएएस होण्याचे हर्षदचे स्वप्न असल्याने त्या दृष्टीने भविष्यातील वाटचाल त्याने सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत कमी निकाल असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेला देशभरातून दीड लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हर्षदचे प्राथमिक शिक्षण सिल्व्हर ओक, तर महाविद्यालयीन शिक्षण बीवायके महाविद्यालयात झाले. वाणिज्य शाखेची पदवी त्याने पुणे येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयातून घेतली. पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना चाणक्य मंडळाच्या माध्यमातून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.