राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव भागवत यांचे निधन Print

महाड,
महाडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत विनायक तथा अण्णा भागवत यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमांतून समासजेवा करीत असलेले स्वर्गीय भागवत कट्टर राष्ट्राभिमानी होते. सार्वजनिक जीवनाची सुरुवात केल्यानंतर ते पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना कारावासदेखील भोगावा लागला होता. बांधकाम व्यवसाय करीत असताना कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्राभिमानी म्हणून रायगड जिल्हा त्यांना ओळखत होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ते आदर्श मानत होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांची जीवनशैली अवलंबली होती. शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त रायगड जिल्हय़ामध्ये समजताच अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे महाड शहरातील जुने-जाणते विचारवंत हरपले अशा शब्दांमध्ये माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.