सुनील चव्हाण यांना महाड पोलिसांकडून सन्मानपत्र Print

महाड,
महाडमधील रुग्णवाहिकेचे मालक सुनील चव्हाण यांनी बजावलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाड शहर पोलिसांनी चव्हाण यांच्या कार्याचा नुकताच गौरव केला. पोलीस वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांनी रायगड पोलीस दलातर्फे त्यांना सन्मानपत्र प्रदान करून सुनील चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाहनचालकाचे प्रशिक्षण पूर्ण करून सुनील चव्हाण यांनी काही काळ खासगी वाहनांवर नोकरी केली. कालांतराने त्यांनी स्वत:च्या मालकीची रुग्णवाहिका घेतली. नंतर काळवेळ न पाहाता रुग्णांची सेवा करण्याचे काम स्वीकारले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळेचे भान न ठेवता मुंबईमध्ये अहोरात्र पोहोचविण्याचे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. रात्री-अपरात्री पोलिसांना सहकार्य करणे, त्यांची अडचण सोडविण्यासाठी धाव घेणे त्याच प्रमाणे कोणताही रुग्ण असला तरी पैशासाठी कधीही अडवणूक न करणे या त्यांच्या सेवाभावी समाजकार्याची दखल महाड शहर पोलिसांनी घेतली आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत जगदाळ यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड पोलीस दलातर्फे सुनील चव्हाण यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक महाड - पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वत्र करण्यात येत आहे.