रायगडातील डेंग्यूची साथ आटोक्यात Print

प्रतिनिधी
अलिबाग
रायगड जिल्ह्यातील नऊ गावांत पसरलेली डेंग्यूची साथ आता आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. व्ही. पाटील यांनी दिली आहे. मुंबईप्रमाणेच पावसाळ्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील १४ गावांत साथीच्या तापाची लागण झाली होती. यात नऊ गावांत डेंग्यूची, एका गावात चिकन गुनियाची, एका गावात मलेरियाची, तर तीन गावांत तापाच्या साथीचा समावेश होता. मात्र हवामानातील झालेले योग्य बदल डासांच्या उत्पत्तीला मारक ठरत असल्याने हळूहळू आता ही साथ आटोक्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पावसाळ्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील १४ गावांत तापाच्या साथीचा उद्रेक झाला होता. यात सर्वाधिक प्रादुर्भाव हा डेंग्यूचा होता. कशेळे, कोप्रोली, तांबाटी, दिघोडे, खानाव वलवली, नारपोली, थेरोंडा, नांदगाव, वडघर या गावांत डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला. नऊ गावांत तब्बल ६४७ तापाचे रुग्ण आढळून आले. यातील ७३ जणांचे रक्त नमुने पुण्यातील विषाणूजन्य संस्थेच्या माध्यमातून तपासले गेले. तपासणीनंतर ३० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर कशेळे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या उद्रेकानंतर २६१ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक जिल्ह्य़ातील विविध भागांत कार्यरत करण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावागावांत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 डेंग्यू तापाची लागण टायगर मॉस्किटो नामक डासामुळे होते. या डासांची उत्पत्ती प्रामुख्याने साठवणीच्या स्वच्छ पाण्यातच होत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डास रात्रीच्या ऐवजी दिवसाच चावत असतात. एक डास एका वेळा ३० ते ४० जणांना चावतो, त्यामुळे एका वेळी ३० ते ४० जणांना डेंग्यूची लागण होते. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला सुरुवातीला तीव्र ताप येतो. त्यानंतर अंगदुखी सुरू होते. कधीकधी रक्तस्राव होतो. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी उपचार होणे गरजेचे असते. डेंग्यूसदृश ताप असल्यास खासगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयात उपचार घेणे उपयुक्त असल्याचे पाटील यांनी सांगितले. घरातील स्वच्छ पाण्याचे साठे रिकामे करणे, गावात कोरडा दिवस पाळणे हे उपक्रम हाती घेतल्यास डेंग्यूसारख्या साथीला रोखता येऊ शकेल, असेही डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केले.