मुंबईतील बूट पॉलिश कारागिरांच्या शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठाचा पुढाकार Print

प्रतिनिधी
नाशिक
मुंबईतील डबेवाल्यांपाठोपाठ आता रेल्वे स्थानकांवर ‘बूट पॉलिश’ करणाऱ्या १०० मुलांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्वीकारली आहे. या वेळी मुंबईत आयोजित कार्यक्रमात विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आ. हेमंत टकले यांनी पादत्राणे पकडणाऱ्या कारागिरांच्या हाती पुस्तके पाहून जणू एक क्रांती होत असल्याचे नमूद केले.
दादरच्या कीर्ती महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठात एका शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. विद्यापीठाची पदवी पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर सरळ पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र ज्यांना पदवी मिळविण्यात रुची नसेल, त्यांना विद्यापीठ विकसित करीत असलेल्या उद्योजकता विकास शिक्षणक्रमाला प्रवेश देण्यात येईल. या वेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आ. हेमंत टकले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. खरे तर अनेकदा आपल्या यशात अतिशय घाईच्या वेळेत आपली पादत्राणे चमकवणाऱ्या बूट पॉलिश कारागिरांचा महत्त्वाचा वाटा असतो. आज हे बांधव प्रथमच महाविद्यालयातील बाकांवर बसले आहेत. पादत्राणे पकडणाऱ्या हातात आज पुस्तके पाहून आपण एका क्रांतीचे साक्षीदार असल्याचा भास होत असल्याचे आ. टकले यांनी नमूद केले. एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शहा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी या कारागिरांनी शिक्षणाविषयी आपली आस्था प्रगट केली. पिढय़ानपिढय़ा आम्ही हेच काम करीत आहोत. किमान पुढील पिढीने चांगले आयुष्य जगावे यासाठी मुक्त विद्यापीठाने शिक्षणासाठी दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थात्मक संप्रेषण विभागप्रमुख श्रीनिवास बेलसरे यांनी प्रास्तविक केले, तर श्रद्धा मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले.