राज्यस्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत वीरेंद्र मंडळ अजिंक्य Print

नाशिक
प्रतिनिधी
सांगलीतील आटपाडी येथे आयोजित राज्यस्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या संघास ३-० असे पराभूत करीत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वीरेंद्र क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकावले.
संघातील खेळाडू महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करतात. हे खेळाडू शहरातील विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळांकडूनही स्पर्धामध्ये सहभागी होतात. स्पर्धेत नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या विभागांतील विजयी संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वीरेंद्र मंडळाने प्रथम नागपूर विभागाचा २-०, उपांत्य फेरीत अमरावती विभागाचा २-० असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेत राजश्री शिंदे, दीपिका पाटील (कर्णधार), तृप्ती उत्तेकर, शिवांगी बिडवे, प्रणीता बस्ते, पूजा धारणकर, ऋचा साळी, प्रियंका पगारे, धनिक हिंगे, सृष्टी पाटील, धनश्री मिठसागर यांचा सहभाग होता. प्रशिक्षक म्हणून राजेंद्र शिंदे तर व्यवस्थापक म्हणून दिनेश जाधव यांनी जबाबदारी पेलली.