अमेरिकेतील शेकडो भारतीय विद्यार्थ्यांची तिकीट बुकिंगमध्ये कोटय़वधीची फसवणूक Print

आतापर्यंत १६६ विद्यार्थ्यांकडून तक्रारी
प्रतिनिधी
पुणे
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची विमानाच्या तिकीट बुकिंगमध्ये चंदीगड येथील इंडोकॅनेडियन कंपनीकडून कोटय़वधीची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत १६६ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ६५ हजार रुपये घेऊन कोणतेही विमानाचे तिकीट न देता फसवणूक केल्याचे म्हटले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कर्वेनगर येथील विद्यार्थ्यांचे पालक प्रकाश रामकृष्ण राळेरासकर यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार, पुण्यासह भारतातील चारशे विद्यार्थी अमेरिकेतील विविध विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थी मध्यम वर्गातील असून शिक्षणासाठी कर्ज काढून शिकतात. या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये नाताळाच्या सुट्टय़ा लागणार आहेत. या काळात भारतात येण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विमानाचे येण्याचे व जाण्याचे तिकीट बुक करण्यासाठी प्राथमिक चौकशी केली. त्यानुसार चंदीगड येथील इंडोकॅनेडियन एंटरप्रायजेस ह्य़ा कंपनीने चांगली सवलत दिल्यामुळे यांच्याकडून विमानाची तिकिटे बुकिंग करण्यास विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. या कंपनीच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार १६६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी येण्या-जाण्याचे एकूण प्रत्येकी ६५ हजार रुपये या कंपनीच्या खात्यात जमा केले. पैसे भरल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी या कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला. मात्र, पुण्यातील तक्रार करणाऱ्या तिघांसह १६६ विद्यार्थ्यांचे विमानाचे ई-तिकीट फायनल झाले नसल्याचे आढळून आले, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
या विद्यार्थ्यांबरोबर पूर्वी काही विद्यार्थ्यांनी याच कंपनीच्या एजंटकडे तिकिटासाठी पैसे भरले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पैसे भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर एअरलाईन्सच्या संकेतस्थळावर विमानाचे सर्व तपशील दिसून येतात, पण हे तपशील फक्त एअरलाईन्स कंपनीला कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता केलेले बुकिंग असून हे फायनल तिकीट नाही. यावर प्रवास करणे शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांना अधिकृतपणे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत १६६ विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत असले तरी हा अकडा चारशे ते पाचशेपर्यंत जाण्याची शक्यात आहे. या कंपनीच्या एजंटकडून जवळजवळ चाळीस कोटीची फसवणूक झाली आहे. याबाबत अमेरिकेत विद्यार्थ्यांनी ‘स्कॅम व्हिक्टीम ग्रुप’ स्थापन केला असून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती गोळा केली जात आहे, असे त्या तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी दुपारी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, तक्रारदार प्रकाश राळेरासकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन या मुलांना न्याय मिळवून द्यावा, या एजंट विरुद्ध योग्य ती करवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त पोळ यांच्याकडे केली आहे.
 याबाबत सायबर व आर्थिक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, आमच्याकडे हा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत गंभीर दखल घेतली असून तक्रार अर्जाप्रमाणे चौकशी सुरू आहे.