कोळबांद्रे गावाची यशोकथा; स्वबळावर सोडवला पाणी प्रश्न! Print

खास प्रतिनिधी
रत्नागिरी  
रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली तालुक्यात वसलेल्या कोळबांद्रे या लहानशा गावातील ग्रामस्थांनी स्वबळावर निधी उभारून आणि गरजेनुसार श्रमदानाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला आहे.
पावसाळ्यात सुमारे दोनशे इंच पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य, हे चित्र कोकणातील गावोगावी, वाडय़ा-वस्त्यांवर दिसते. त्यापैकी अनेक ठिकाणी जलस्वराज्यसारख्या सरकारी योजनांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न यशस्वीपणे झाले आहेत. पण त्यावर अवलंबून न राहता कोळबांद्रे गावच्या कुंभारवाडीतील सुमारे ५० कुटुंबांनी स्वबळावर या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आणि एकीच्या बळावर तो प्रत्यक्षातही आणला.
या अनोख्या यशोकथेबद्दल माहिती देताना विनायक बाळ यांनी सांगितले की, कुंभारवाडीतील प्रकाश गुंदेकर या तरुणाला हा प्रश् न तीव्रपणे जाणवल्यावर त्याने ग्रामस्थांना संघटित केले. पण वाडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाणी आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी यंत्रसामग्री आणि मजुरी मिळून सुमारे पंधरा लाख रुपये खर्च आला असता. पण ग्रामस्थांनी श्रमदानाचा निर्णय घेऊन मजुरीचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाचवला. वाडीतील बहुसंख्य कष्टकरी असल्यामुळे श्रमदानासाठी दिवस मोडणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. म्हणून प्रत्येकी अकराजणांचे चार गट करून रात्रीच्या वेळात श्रमदान सुरू झाले. डोंगराजवळ प्रफुल्ल जुवेकर यांनी शेततळ्याची जागा या योजनेसाठी दिली. तेथून सुमारे एक किलोमीटर उंच डोंगरावर साडेसात फूट खोल आणि पंधरा फूट व्यासाची गोल टाकी बांधण्यात आली. पण विहिरीतील पाणी या टाकीत उचलून टाकणे ही महाकर्मकठीण बाब होती. त्यासाठी गावातील तुळपुळे अ‍ॅग्रो ही संस्था पुढे आली आणि पाच अश्वशक्तीची मोटार उपलब्ध करून दिली. त्यामुळे विहिरीतून चाळीस हजार लीटर पाण्याचा साठा टाकीत करणे शक्य झाले. सुयोग्य पद्धतीने दैनंदिन पाणी वाटपासाठी वाडीत चौदा नळ कोंडाळी बांधण्यात आली. तसेच पाण्याच्या शुद्धीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली.
    अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि एकीच्या बळावर आता वाडीमध्ये दररोज सकाळी पाऊणतास सर्वाना पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यासाठी पगारी माणसाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आता वाडीने शिवतरुण मित्रमंडळ या नावाने संघटनेची नोंदणी केली असून गावातील धार्मिक कार्ये, लग्नकार्ये, गणेश विसर्जन इत्यादी सर्व प्रकारच्या उपक्रमांसाठी मंडळाचे कार्यकर्ते तत्परतेने पुढे असतात. थोडक्यात सांगायचे तर पाणी प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले वाडकर आता एकमेकांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या सुख-दु:खाचे वाटेकरी झाले आहेत.