गॅस सिलेंडरच्या केवायसी फॉर्ममुळे ग्राहकांमध्ये असंतोष Print

वार्ताहर
सावंतवाडी
गॅस सिलेंडरची दरवाढ ग्राहकांना आर्थिक फटका देणारी ठरत असतानाच सरसकट ग्राहकांना केवायसी फॉर्म भरून देण्यासाठी गॅस वितरण एजन्सीकडून आग्रह धरण्यात येत आहे.
प्रत्यक्षात केवायसी फॉर्म सरसकट ग्राहकांनी भरून देण्याची गरज नसतानाही ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. गॅस कंपन्या किंवा पुरवठा विभागाने ग्राहकांना योग्य ती माहिती देण्याची आवश्यकता असूनही सिंधुदुर्गमध्ये यंत्रणा सुशेगात असल्याने नाराजी होत आहे.
गॅस सिलेंडर ग्राहकाने केवायसी फॉर्म भरून द्यावा म्हणून गॅस वितरण एजन्सीने पाच रुपयांत नमुना फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्या विरोधातही राजकीय पक्षांचे आंदोलन झाले, पण प्रत्यक्षात शासनाचा पुरवठा विभाग डोळेझाक करीत असल्याने ग्राहकांत नाराजी आहे.
पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार केवायसी फॉर्म सरसकट सर्वच ग्राहकांना भरून देण्याची गरज नाही. एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन्स एकाच पत्त्यावर आहेत त्यांनी हा फॉर्म भरून देण्याची गरज आहे. शिवाय नवीन कनेक्शन, तात्पुरते बंद कनेक्शन सुरू करावयाचे झाल्यास किंवा ट्रान्स्फर कनेक्शनबाबतीत हा फॉर्म भरून देण्याची गरज असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त ग्राहकांकडे वेगवेगळ्या नावावर एकाच पत्त्यावर गॅस कनेक्शन्स आढळून आली असल्याने केवायसी फॉर्म भरून देण्याची सक्ती करण्यात आली आहे, पण हा फॉर्म सरसकट सर्वानीच भरावा, असा आग्रह धरणे योग्य नाही, असे सांगण्यात येते. गॅस कनेक्शन बुकिंग व डिलिव्हरीमध्ये २१ दिवस थांबण्याची गरज नाही. गॅस सिलेंडर घरपोच देण्यासाठी कंपनी पैसे देते, त्यामुळे आणखी पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगण्यात आले.
गॅस ग्राहक मयत झाल्यास कनेक्शन रद्द होत नाही, ते कुटुंबातील वारसाच्या नावावर योग्य प्रक्रिया करून नोंदविता येते.
जिल्हापुरवठा विभागाने केवायसी फॉर्म भरण्याच्या आग्रहावर तोडगा काढणे आवश्यक मानले जाते.