नाशिकच्या ‘रास्कल’चा गौरव Print

प्रतिनिधी ,नाशिक
रंगभूमी दिनानिमित्त मुंबई येथे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नाशिक शाखेने सादर केलेली श्रीपाद देशपांडे लिखित ‘रास्कल’ एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. बारामती येथे होणाऱ्या नाटय़ संमेलनात ही एकांकिका सादर केली जाणार आहे. प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे स्मृती एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर रंगभूमी दिनी स्पर्धेची महाअंतिम फेरी दादर येथील यशवंतराव चव्हाण नाटय़मंदिरात झाली. या फेरीत ‘रास्कल’ने निर्मितीसाठी प्रथम, लेखनसाठी श्रीपाद देशपांडे यांना प्रथम, तर दिग्दर्शनासाठी प्रणव पगारे, प्राजक्त देशमुख, प्रफुल्ल दीक्षित यांना द्वितीय, प्रकाश योजनेसाठी राजेश भुसारे, प्रफुल्ल दीक्षित, नेपथ्यसाठी हेमंत महाजन, राकेश रामराजे, पंकज पगारे, संगीतसाठी शिवा आहिरे, गिरीश गर्गे, मयूरी मंडलिक, यांना द्वितीय, अभिनयासाठी श्रीपाद देशपांडे यांना प्रथम, स्त्री गटात श्रद्धा हर्णे तर उत्तेजनार्थ म्हणून प्रणव पगारे, प्राजक्त देशमुख यांना पारितोषिके मिळाली. परीक्षक म्हणून मंगेश कदम, चंद्रकांत मेहेंदळे यांनी काम पाहिले. अभिनेते विनय आपटे, निर्माती-दिग्दर्शक स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. दरम्यान, मागील वर्षी नाशिक शाखेने सादर केलेली ‘पाणीपुरी’ एकांकिका स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरल्याने सांगली येथील नाटय़ संमेलनात तिचे सादरीकरण झाले. यंदाही रास्कल एकांकिका स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरल्याने आगामी काळात बारामती येथे होणाऱ्या नाटय़संमेलनात ती सादर होणार आहे. नाशिक शाखेला हा मान सलग दुसऱ्यांदा मिळत आहे.