सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या! Print

उसाच्या दरावरून आंदोलन चिघळले
वार्ताहर, इंदापूर
साखर कारखान्यांनी जाहीर केलेला प्रतिटन २ हजार शंभर रुपये उसाचा दर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मागे घेत नाहीत व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दर जाहीर होत नाही तोपर्यंत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी जारी केले आणि उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनास हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर ऊस दराच्या प्रश्नासाठी काटा बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांतून मोठय़ा संख्येने आंदोलक कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर जमा झाले. मात्र कारखान्याच्या आवारात पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केल्याने, कारखान्याच्या आवाराबाहेर संघटनेने सभेचे आयोजन केले. कर्मयोगी कारखान्याने कालच ऊस तोडणी बंद करून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काटा बंद केला होता.
या सभेत बोलताना खा. राजू शेट्टी म्हणाले, ही शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी लढाई आहे. साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर हा एकतर्फी असून आम्हाला तो मान्य नाही. उसाच्या उताऱ्यानुसार दर जाहीर करावा ही आमचीही भूमिका आहे. चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. राज्यकर्त्यांनी चर्चेची तयारी दाखवून ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यकर्त्यांनी चर्चेची तयारी न दाखविल्यास ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी आम्ही कर्मयोगीवर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. आमचा एकही शेतकरी इथून हलणार नाही, असे खा.राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्य सरकारला जयसिंगपूर मेळाव्यात व पंढरपूर मेळाव्यात ऊस दराच्या प्रश्नासाठी १० दिवसांची मुदत दिली होती. मात्र या प्रश्नातून शासनाने अंग काढून घेतले. सहकारी साखर कारखान्यांसाठी शासनाने १.९ भाग भांडवल राज्यातील १२ कोटी जनतेच्या करातून दिले. साखर उद्योगातून ८ हजार कोटी रुपयांचा कर राज्य शासन गोळा करते, तर या प्रश्नातून सरकारला अंग काढण्याचा काय अधिकार आहे. हा प्रश्न राज्य शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडवावा. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काटा बंद व ठिय्या आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयंत बगाडे, भगवानराव काटे, नीलेश देवकर, विजय गायकवाड, आदींसह मोठय़ा संख्येने राज्यभरातून आलेले आंदोलक उपस्थित होते. कर्मयोगीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.