कात्रज बोगद्यात ट्रकला आग, वाहतूक ठप्प Print

प्रतिनिधी, पुणे
कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागली. आग विझवून ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
मुंबईतील गजानन रोडलाईन्स कंपनीचा हा ट्रक मुंबईहून विविध वस्तू घेऊन आला होता. बोगद्यात आल्यानंतर इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ट्रक थांबवून बाजूला घेतला.चालकाने तातडीने पोलिसांनी दूरध्वनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशामक दलाला याबाबत कळविले. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळेतच आग आटोक्यात आणून पूर्णपणे विझविली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आला. आगीमुळे संपूर्ण बोगदा धुराने भरून गेला होता. प्रचंड धुरामुळे बोगद्यात जाणेही कठीण झाले होते.