मद्यनिर्मिती घसरल्याने करवसुली थंडावली! Print

प्रतिनिधी, औरंगाबाद
बिअर व विदेशी मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या औरंगाबादेत धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे, तर विदेशी मद्य बनविणाऱ्या डीजीआयओ कंपनीने तिची शाखा पंजाबमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे या कंपनीचे या महिन्यातील उत्पादन १८ टक्क्य़ांनी घटले आहे. मिलेनियम व काल्स बर्ग या दोन बिअर कंपन्यांचे उत्पादन या महिन्यात घटले. काही कंपन्यांचे उत्पादन वाढूनही राज्य उत्पादन शुल्क मात्र उणे चिन्हातच दर्शविले जात आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही तूट ८ कोटी २९ लाख ५२ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.
बिअर उत्पादनावर येत्या काही दिवसांत पाण्याचे संकट येऊ शकते. दारू कंपन्यांना पाणीपुरवठा करण्याऐवजी शेतीला पाणी दिले जावे, तसेच पाणी उपशासाठी वीजजोडण्या द्याव्यात, यासाठी पैठणच्या शेतकऱ्यांनी नुकतेच आंदोलन केले. एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची वीज शेतकऱ्यांनी तोडली होती. या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यातील मद्यनिर्मितीचे आकडे व राज्य उत्पादन शुल्काच्या करवसुलीचे आकडे घसरले आहेत. ओबीडी व डीआयजीओ या दोन विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची आकडेवारी आहे.