काँग्रेसने वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीही तयार-अजित पवार Print

वार्ताहर , जळगाव
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून त्यांची तयारी करून घेत आहोत, असे स्पष्ट करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळासाठी तयार राहण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले. जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी करणारे खा. ईश्वरलाल जैन यांच्यावर कारवाईचा अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
येथील गुलाबराव देवकर महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता अभ्यास शिबिरादरम्यान पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी शिबीर घेण्यामागचे कारण सांगितले.
एखादी व्यक्ती किंवा पक्ष पुढे जात असल्यास त्यास बदनाम करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे खालच्या दर्जाचे राजकारण सध्या खेळले जात आहे. राष्ट्रवादीने सुरुवातीला स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसशी आघाडी केली. आघाडी असली तरी गेल्या काही वर्षांत अनेक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष परस्परांविरोधात लढले. निवडणुकांप्रसंगी करण्यात येणारा विरोध हा तात्कालिक असतो. त्याचा आघाडीच्या सरकारवर कोणताही परिणाम होत नाही. जातीयवादी शक्ती प्रबळ होऊ नये, यासाठी आघाडी धर्म पाळतो, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 जळगाव जिल्हा बँकेतील राजकारणाविषयी विचारले असता, सहकारात राजकारण नको हे आपण मानतो, पण जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असताना असे व्हायला नको होते, असे ते म्हणाले. ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची लायकी नाही, ते खासदार होतात. त्यांच्यावर शरद पवारच कारवाई करतील, असा इशारा खा. ईश्वरलाल जैन यांचे नाव न घेता अजितदादांनी दिला.
 या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री गुलाबराव देवकर, या मंत्र्यांसह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.