मनमाड नगराध्यक्षपदी राजेंद्र पगारे Print

मनमाड
पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र पगारे यांची शुक्रवारी आयोजित विशेष सभेत अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. पगारे यांना २२, तर शिवसेनेचे गटनेते संतोष बळीद यांना ४ मते मिळाली.
पगारे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, आरोग्य यांसह मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिक्रिया पगारे यांनी व्यक्त केली. या वेळी शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी आवर्तन पद्धतीने दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजेंद्र आहिरे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.