सिंधुदुर्गमध्ये डेंग्यूचा रुग्ण नाही -डॉ. सोडल Print

वार्ताहर , सावंतवाडी
वातावरणातील बदलामुळे सिंधुदुर्गात तापाचे रुग्ण फणफणताहेत, पण त्यात मलेरिया किंवा डेंग्यूचा रुग्ण नाही, तसे वैद्यकीय निदान झाल्याची माहिती जिल्हा परिषद  वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडल यांनी बोलताना दिली. जिल्ह्य़ात रामगड व उंबर्डे येथे आढळून आलेले दोन रुग्ण डेंग्यूच्या तापाचे नव्हेत. त्यांच्यावर योग्य निदान झाले असल्याची माहिती डॉ. सोडल यांनी दिली. वातावरण बदलामुळे तापाचे रुग्ण आढळत आहेत. त्यात मलेरिया किंवा डेंग्यूच्या रुग्णांचा समावेश नाही. सध्या तरी या साथीचा एकही रुग्ण नसल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जानेवारीपासून १६५ मलेरिया व १२ डेंग्यूचे तर ३७ लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर निदान करून उपचार करण्यात आले, असे डॉ. सोडल यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य यंत्रणा मलेरिया, डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबत दक्षता घेण्यास जागृती करीत आहेत. या आजाराचे रुग्ण सध्या नाहीत. पावसाच्या सुरुवातीला हे रुग्ण आढळून आल्याचे डॉ. सोडल यांनी सांगितले. मलेरिया व डेंग्यू रुग्णांची माहिती जिल्ह्य़ातून तात्काळ गोळा केली जाते, पण वैद्यकीय निदानात सध्या रुग्ण आढळले नाहीत, असे डॉ. सोडल म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सध्या तापाने रुग्ण फणफणताहेत, पण आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याची टीका केली जात आहे.