नक्षलवादी दाम्पत्याचे आंध्रात आत्मसमर्पण Print

खास प्रतिनिधी, चंद्रपूर
गेल्या वीस वर्षांपासून चळवळीत सक्रिय असलेला व गेल्या सात वर्षांपासून दक्षिण गडचिरोली विभागाचे नेतृत्त्व करणारा जहाल नक्षलवादी शेखर अण्णा व त्याची पत्नी विजयाक्का यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्हय़ात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शेखरवर गडचिरोलीत ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.    आंध्रातील करीमनगर जिल्हय़ातील मच्चुपेठा गावचा शेखर पदवीधर झाल्यानंतर चळवळीत दाखल झाला. सुमारे तेरा वष्रे आंध्रप्रदेशात काम केल्यानंतर शेखरला सात वर्षांपूर्वी दक्षिण गडचिरोलीत पाठवण्यात आले.  त्याच्या सोबत त्याची पत्नी विजयाक्का सुध्दा गडचिरोलीत दाखल झाली. २००९ मध्ये लाहेरी जवळ सी-६० च्या १७ जवानांना ठार करण्यात शेखरचा मोठा वाटा होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या पत्नीची प्रकृती साथ देत नव्हती. तिच्यावर योग्य उपचार होत नसल्याने हे दोघेही अस्वस्थ होते.