राजकीय किंमत मोजावी लागली तरी मराठवाडय़ाला पाणी सोडा! Print

धाडसी निर्णय घेण्याचे पवारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
विशेष प्रतिनिधी, पुणे
‘‘मराठवाडय़ात माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणी नसताना वरून पाणी न सोडणं हे माणुसकीच्या विरोधी आहे. पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातील लोकांना माझी विनंती आहे अशी भूमिका घेऊ नका. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचे आवाहन केले. त्याच वेळी ‘निवडणुकीत किंमत मोजावी लागली तरी मराठवाडय़ाला पाणी सोडा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांना याबाबत धाडसी निर्णय घेण्याचा सल्लाही दिला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमानिमित्त पवार पुण्यात बोलत होते.  ते म्हणाले, ‘‘ मराठवाडय़ावर सध्या दुष्काळाचे संकट आहे. शेतीसाठी पाणी नाहीच, पण आता माणसं व जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नाही. अशा वेळी वरून पाणी सोडावं लागतं. आपल्याकडे एक तीळ सातजणांनी वाटून खाण्याची परंपरा आहे. ’’ याच वेळी पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडून होणारा पाण्याचा वापर वाढला असल्याचे दाखले दिले.  विजेच्या जास्त वापरामुळे पाणी जास्त प्रमाणात उपसले जात आहे, त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाणाऱ्या प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे पाण्याचा कसा वापर व्हावा, याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
‘ बावीसशे कोटींचा प्रस्ताव’
राज्यातील जिल्ह्य़ाजिल्ह्य़ात व तालुक्यात असमतोल आहे. नागरिकांचा जीवनस्तर उंचवायचा असेल, तर तो असमतोल दूर झाला पाहिजे. त्यासाठी यापुढे शासन तालुका हा घटक ठेवून असमतोलाचा विचार करणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ांचा तुलनात्मक अभ्यास असणारा मानवी विकास निर्देशांक अहवालही प्रकाशित केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.