सहा डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेण्याचा आठवलेंचा इशारा Print

प्रतिनिधी, अलिबाग

पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्यासमोर आरपीआय निदर्शने करेल, असेही त्यांनी जाहीर केले.
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाला देण्याबाबत पंतप्रधांनांनी दिल्लीत अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत अनुकूलता दाखवली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाला ही जागा राज्यसरकारकडे वर्ग करण्याचे सूचित केले आहे. मात्र तरीही वस्त्रोद्योग मंत्रालय ऐकत नसेल तर आरपीआय कार्यकर्ते गप्प बसणार नाही.इंदू मिलच्या जागेसंदर्भात पाच डिसेंबपर्यंत निर्णय झाला नाही तर सहा डिसेंबरला आरपीआयचे कार्यकर्ते मिलचा ताबा घेतल्याशिवाय राहाणार नाही. पोलिसांनी कितीही बंदोबस्त केला तरीही माघार घेणार नाही असा इशारा आठवले यांनी दिला.     
राज ठाकरे महायुतीत नकोत
 राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये, असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला. त्यांच्या महायुतीत येण्याला आरपीआयचा ठाम विरोध राहील असेही ते म्हणाले. दलित समाजात राज ठाकरे यांच्याबद्दल नाराजी आहे. राज ठाकरे यांनी अनेकदा दलित समाजाबद्दल अपशब्दही काढले आहेत त्यामुळे त्यानी महायुतीत येऊ नये आणि जर ते येणार असतील तर आरपीआयचा त्याला ठाम विरोध असेल .   बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्या भेटी राजकीय नाहीत. त्या खासगी आणि कौटुंबिक आहेत. त्यामुळे त्याबाबत काही तर्क करणे चुकीचे ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.