रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बेमुदत संपावर Print

alt

मुंबई, ३ ऑक्टोबर २०१२
डॉ. हकीम यांच्या शिफारशींनुसार टॅक्सीच्या भाडय़ात किमान तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे या मागणीसाठी येत्या रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बोमुदत संपावर जाणार आहेत. जोपर्यंत किमान तीन रूपये भाडेवाड मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संपाचा इशारा टॅक्सी चालक-मालकां संघटनेने दिला आहे. यासाठी टॅक्सी चालक-मालकांची संयुक्त कृती समितीही त्यासाठी स्थापन करण्यात येत आहे. टॅक्सीचालकांच्या संघटनेचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता किमान भाडे सतरा रूपयांवरून वीस रूपये होण्याची शक्यता आहे. या संपामध्ये मुंबईतील पस्तीस हजार टॅकसी सहभागी होणार आहेत.
डॉ. हकीम यांनी रिक्षाप्रमाणेच टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत शिफारशींचा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सरकारने त्यातही काही सुधारणांसह शिफारशी स्वीकारल्या आहेत. सरकारने हकीम यांच्या शिफारशींमध्ये बदल करून केवळ एक रुपया इतकी नाममात्र वाढ केल्याचे टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे. रिक्षापेक्षा टॅक्सीचा देखभालीसह अन्य खर्च जास्त असूनही सरकारने केवळ एक रुपया वाढ केल्यामुळे टॅक्सीचालकांध्ये तीव्र नाराजी आहे. रिक्षाचालक-मालकांप्रमाणेच आता टॅक्सीचालक-मालकांचीही संयुक्त कृती समिती स्थापन करून डॉ. हकीम यांचा अहवाल संपूर्णपणे स्वीकारण्यात यावा, या मागणीसाठी रविवारपासून ‘टॅक्सी बंद’ आंदोलन पुकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने स्वीकारलेल्या हकीम समितीच्या अहवालावर भाडेनिश्चितीच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र परिवहन प्राधिकरणाची बैठक अद्याप बोलाविण्यात आली नसून लवकरच ती बोलाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीमध्ये भाडेवाढीची तारीख निश्चित होणार आहे.