मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांचा घाणप्रकरणी उद्रेक Print

प्रतिनिधी , मुंबई
कर्जत येथून सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या उपनगरी गाडीच्या महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा टाकण्याच्या विकृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून महिला प्रवासी त्रस्त झाल्या असून आता या संतापाचा उद्रेक होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. हा प्रकार थांबविण्याबाबत रेल्वे प्रशासन थंडच असल्याने बुधवारी काही महिलांनी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयावर धडक दिली. तथापि, हा प्रकार बंद करण्यासाठी केवळ प्रयत्न करण्याच्या आश्वासनापलीकडे प्रवासी महिलांच्या पदरी काहीही पडले नाही.
बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कर्जतहून सुटलेल्या गाडीच्या कर्जत दिशेकडील महिलांच्या डब्यात सर्वत्र मानवी विष्ठा टाकलेली पाहून डब्यात प्रवेश करतानाच महिला प्रवासी हैराण झाल्या. बुधवारी सकाळी ही गाडी २० मिनिटे कर्जत स्थानकात थांबलेली असतानाही तेथे या डब्याची स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. नेरळ येथून चढलेल्या महिलांनी आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधला. पहिला संपर्क रेल्वे पोलिसांशी झाला. पण त्यांनी ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर देऊन त्यांनी ही समस्या झटकून टाकली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या १२७५ क्रमांकावर कळविण्यात आले तेव्हा त्यांनी चक्क दुरुत्तरे केल्याचे महिलांनी सांगितले. संतप्त महिलांनी कल्याण येथे तब्बल ४० मिनिटे गाडी रोखून धरली. पण तेथेही कोणी डबा स्वच्छ करण्यास आले नाही, असे माझगाव येथे विक्रीकर विभागात नोकरी करणाऱ्या प्रज्ञा ब्रम्हांडे यांनी सांगितले. शेवटी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गाडी आल्यावर तिचा परतीचा प्रवास रद्द करून ती स्वच्छतेसाठी पाठविण्यात आली.