मद्यधुंद सलमानच्या गाडीखाली चिरडलेले अद्याप नुकसानभरपाईविनाच Print

प्रतिनिधी, मुंबई
अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावरील पाच जणांना चिरडल्याच्या घटनेला १० वर्षे उलटली. मात्र त्याने जखमींच्या नुकसानभरपाईसाठी सरकारदरबारी जमा केलेली १७ लाख रुपयांची रक्कम अद्याप संबंधितांना मिळाली नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयाने सलमानला नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश देताना राज्य व केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दोघांनीही अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याची बाबही बुधवारच्या सुनावणीत पुढे आली. त्यामुळे न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना नोटीस बजावली आहे.
सलमानने २९ सप्टेंबर २००२ रोजी मद्यधुंद अवस्थेत आपल्या ‘लॅण्ड क्रुझर’ या आलिशान गाडीने वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या पाचजणांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लगेचच जनहित याचिका करून पत्रकार निखिल वागळे, निळू दामले यांनी मोटार परिवहन कायद्यात बदल करून सदोष मनुष्यवधासाठी असलेल्या शिक्षेत तसेच नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी केली होती.