लैला खान हत्याकांडप्रकरणी आरोपपत्र दाखल Print

प्रतिनिधी , मुंबई
अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी जिल्हा न्यायालयात ९२६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १०१ साक्षीदारांचा समावेश असून, ओळख परेडमध्ये ९ साक्षीदारांनी मुख्य आरोपी परवेज टाक याला ओळखल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. ९ फेब्रुवारी २०११ रोजी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांसह सहा जणांची इगतपुरी येथे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने लैला खानचा सावत्र पिता परवेज टाक याला अटक केली. त्याने आणि काश्मीरहून आणलेला स्वयंपाकी शाकीर या दोघांनी मिळून या हत्या केल्या. गुन्हे अन्वेषणच्या युनिट आठने या हत्येचा तपास केला होता. पोलिसांनी १०१ साक्षीदार या खटल्यामध्ये उभे केले आहेत. आरोपी परवेज टाकला बॉलीवूडमध्ये काम करायचे होते. त्यासाठी लैलाची आई सलिनाने त्याला मुंबईत आणले व त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते. सलिनाने नंतर परवेजशी लग्न केले. त्याला खान कुटुंबीयांकडून घरात दुय्यम वागणूक मिळत असल्याने हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.