‘आदर्श’मध्ये नातेवाईकांचे फ्लॅट असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे कळले! Print

अशोक चव्हाण यांचा दावा
प्रतिनिधी, मुंबई

सासू, चुलत सासरे आणि मेव्हण्याच्या पत्नीच्या नावे ‘आदर्श’ सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याची बाब आपल्याला घोटाळ्यासंदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांद्वारे कळली, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांनी गुरुवारी द्विसदस्यीय चौकशी आयोगासमोर केला. मुंबई-पुण्यातील सरकारी जमिनी सहकारी सोसायटीला देण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, असे सांगत त्यांनी ‘आदर्श’चे खापर पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माथी फोडले.

चव्हाण यांची सोसायटीच्या सदस्यत्वाच्या मुद्दय़ावरून अपूर्ण राहिलेली साक्ष गुरुवारी पूर्ण झाली. सासू भगवती शर्मा, चुलत सासरे मदनलाल शर्मा आणि मेहुण्याची पत्नी सीमा अशा तिघांनी ‘आदर्श’च्या सदस्यत्त्वासाठी अर्ज केले होते आणि त्यांना सदस्यत्व मिळाले याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. ऑक्टोबर २०१० च्या अखेरीस घोटाळ्यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांमधून आपल्या काही नातेवाईकांनीही सोसायटीच्या सदस्यत्वासाठी अर्ज केल्याचे आणि त्यांना सदस्यत्व मिळाल्याची बाब कळली. विशेषकरून त्यांनी सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर हे कळल्याचे ते म्हणाले. सीमा यांनी २००४ साली म्हणजेच आपण महसूल मंत्री असताना सोसायटीच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. परंतु नंतर २००८ मध्ये (मुख्यमंत्री असताना) तो मंजूर करण्यात आल्याबाबतही आपल्याला काहीच माहीत नसल्याचे चव्हाण यांनी आयोगाला सांगितले. आपली पत्नी अमिता आणि मेहुणा विनोद हे सासू भगवती यांचे कायदेशीर वारस आहेत. मात्र ‘आदर्श’मधील फ्लॅट परत करताना आपल्या पत्नीने संमती दिली होती की नाही याबाबतही आपल्याला काहीच माहीत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.