प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश Print

खास प्रतिनिधी , मुंबई

टॅक्सी व ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यासंदर्भात हकिम समितीच्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर भाडेवाढीचा काही प्रमाणात भार पडणार आहे. मात्र यापुढे प्रवाशांना चांगली सेवा न देणाऱ्या व  ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरुध्द कठोर कारवाई करा. प्रसंगी त्याचे परवाने रद्द करून फौजदारी कारवाई करा, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. भाडेवाढीबरोबरच समितीने शिफारस केल्याप्रमाणे किंवा शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी इतर बाबींचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी परिवहन विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी ऑटोरिक्षांबरोबर टॅक्सींमध्येही इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे करावे आणि बोगस भाडेपत्रक वापरून किंवा इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशाना लुटणाऱ्या रिक्षा- टॅक्सी चालकावर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्यासारखी कडक कारवाई करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यानी दिले.