मुलगी झाल्याने खेरवाडीत पत्नीची हत्या Print

प्रतिनिधी, मुंबई
खेरवाडी येथे पत्नीची हत्या करणा-या पतीला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे. अनिल कुमार कनोजिया (२८) असे या आरोपीचे नाव आहे. दुसरी मुलगी झाल्याने कनोजिया याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
खेरवाडी येथील घनश्याम चाळीत कनोजिया पत्नी संगीता (२२) हिच्यासह राहत होता. त्याचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला तीन वर्षांची रोशनी ही मुलगी होती. सहा महिन्यांपूर्वी मुस्कान या पुन्हा मुलीचाच जन्म झाल्याने तो संगीताला सतत मारहाण करीत होता. २७ सप्टेंबर रोजी संगीता आजारी पडली होती. तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बरी होऊन ती घरी आली. मात्र १ ऑक्टोबर रोजी तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारपणातच संगीताचा मृत्यू झाल्याचे कनोजिया याने भासवले होते. परंतु शव विच्छेदन अहवालात संगीताचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री निर्मल नगर पोलिसांनी कनोजिया याला अटक केली.
नेमकी हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खकाळे यांनी सांगितले.