टपाल भरतीसाठी नोंदणी करूनही लाखो तरुणांना अर्ज मिळालेच नाहीत Print

‘ऑफलाइन’ आणि ‘ऑनलाइन’चा गोंधळ
गोविंद तुपे, मुंबई

काही दिवसांपूर्वीच टपाल खात्याने नोकरभरतीची घोषणा करून भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पण ‘ऑफलाइन’ आणि ‘ऑनलाइन’ गोंधळात लाखो तरुणांना अर्जच न मिळाल्याने संधीला मुकावे लागले आहे.  ऑनलाइन प्रक्रियेत ज्यांनी नोंदणी केली त्यापैकी बऱ्याचजणांना अद्याप अर्जच प्राप्त झालेले नाहीत. गंमत म्हणजे ऑनलाइन भरती प्रक्रियेतही ‘ऑफलाइन’चाच समावेश होता. त्यामुळे हा घाट कशासाठी घातला आणि काय साधले, असे सवाल निर्माण झाले आहेत. अर्ज अपुरे पडू लागल्यामुळे ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये टपाल खात्याच्या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर तुमच्या इमेलवर पाच दिवसांनंतर अर्ज प्राप्त होईल, असे सांगण्यात आले होते. त्यातही कहर म्हणजे इमेलवर अर्ज आल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्यात योग्य ती माहिती भरून पुन्हा तो स्पीड पोस्टाने दिल्ली दरबारी पाठवायचा होता. त्यामुळे मग हा ऑनलाइनचा अट्टहास का करण्यात आला, असा अर्जदारांचा सवाल होता. मात्र, याचे ठोस उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.
कारण ऑफलाइन भरती प्रक्रिया फसली असल्याचे उघडपणे कबूल करण्याची या अधिकाऱ्यांची तयारी नव्हती.
ही सगळी प्रक्रिया अतिशय गलथानपणे राबविली गेली. ज्या उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी अशांना दोन-दोन आठवडे इमेलवर अर्ज मिळाले नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ही प्रक्रिया सुरू झाल्याच्या दहाव्याच दिवशी सहा लाख उमेदवारांना अर्ज मिळालेले नव्हते. ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. पण नंतर परस्थिती सुधारल्याचा दावा त्यांनी केला.
पण नोंदणीनंतर अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख फक्त पाच दिवसांनी होती. त्यामुळे अंतिम टप्प्यात ज्या तरुणांनी नोंदणी केली त्या तरुणांना अर्जच मिळाले नाहीत. ज्यांना अर्ज मिळाले त्यांचे पोहचू शकले नाहीत.
पण संतापजनक बाब म्हणजे यासंदर्भातील कोणत्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत, असे पोस्ट मास्तर जनरल ए. के. शर्मा सांगत आहेत. कुणी तक्रारी केल्या तर विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. ज्यांना ‘ऑनलाइन’ ‘ऑफलाइन’ गोंधळाचा फटका बसला अशाांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.