पुतण्याने चौथ्या मजल्यावरून फेकल्याने वृद्धाचा मृत्यू Print

प्रतिनिधी, मुंबई
संपत्तीच्या वादावरून पुतण्याने आपल्या काकाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना अंधेरी येथे घडली आहे. या घटनेत मरण पावलेले अझीझ रेहमान खान (६५) हे चित्रपट निर्माते साजिद नाडीयादवाला यांचे सासरे आहेत. खान यांना खाली फेकणारा त्यांचा पुतणा शाहजेब खान याला पोलिसांनी अटक केली आहे.
अंधेरीच्या सात बंगला येथील सौरभ इमारतीत एच विंगमध्ये अझीझ खान राहत होते. त्याच इमारतीत त्यांचा भाऊ खलिद खान हे सुद्धा राहतात. या दोन भावांमध्ये मालमत्तेवरुन वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी एफ विंगमधील चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या खालीद खान यांना भेटण्यासाठी अझीझ गेले. खलिद यांचा मुलगा शाहजेब याने दार उघडल्यावर आपले वडिल घरी नाहीत, असे सांगून काकांना परत पाठवले. थोडय़ा वेळाने अझीझ पुन्हा गेले. त्यावेळी पुतण्या शाजेब याने त्यांच्याशी भांडण केले. रागाच्या भरात शाहजेबने अझीझ यांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. त्यांना कोकीळाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी शाहजेबाला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.