इंदू मिल आंदोलनात आरपीआयला शिवसेनेची साथ Print

खास प्रतिनिधी
मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलची संपूर्ण जमीन देण्याचे खुद्द पंतप्रधांनांनी मान्य केले असताना रिपाब्लिकन पक्षाच्या वतीने सातत्याने त्यावर आंदोलने करण्यात येत आहेत. आता पुन्हा या प्रश्नावर १५ ते २२ ऑक्टोबर या दरम्यान आरपीआयच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी आरपीआयच्या आंदोलनात शिवसेना व भाजपचे नेतेही उतरणार आहेत. या दोन पक्षाच्या मदतीने पुन्हा आंदोलन करुन प्रस्तावित आंबेडकर स्मारकाची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरे यांची व त्यांच्या मनसेची कोंडी करण्याची आरपीआयची खेळी असल्याचे बोलले जाते.
गेल्याच आठवडय़ात पार पडलेल्या आरपीआयच्या मेळाव्यात रामदास आठवले यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजपचे नेते गोपनिाथ मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या अजेंडय़ावरील सामाजिक आरक्षण, दलितांवरील अत्याचार, हे विषय बाजूला ठेवून इंदू मिलची जमिन मिळविण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.