मागासवर्गीय औद्योगिक संस्थांमध्ये घोटाळा Print

१५१ संस्थांना फौजदारी कारवाईच्या नोटिसा
खास प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील काही बोगस मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थांना देण्यात आलेल्या निधीच्या वाटपात घोटाळा झाल्याच्या भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी दुजोरा दिला. निधीचा गैरवापर करण्यात आल्याच्या संशयावरुन १५१ सहकारी संस्थांना फौजदारी गुन्हे दाखल का करु नयेत अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती त्यांनी मंत्रालयात पत्रकारांना दिली. मागासवर्गीय संस्थांचा निधी इतर खात्यांकडे वळविला जात आहे, या आंबेडकर यांच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला.
राज्यात २००४ पासून अनुसूचित जातीमधील तरुण-होतकरु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अनुदान, भागभांडवल, कमी व्याजदरात कर्ज असा वित्तपुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली. परंतु त्याचा मोठा प्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी याच सदंर्भात मंगळवारी पत्रकार परिषदेत गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर या योजनेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याचा घाट घातल्याची टीका करीत तसा निर्णय झाला तर सामाजिक न्यायमंत्री मोघे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. शिवाजीराव मोघे यांनी आंबेडकर यांच्या आरोपावर मंत्रालयात तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. मागासवर्गीयांच्या सहकारी औद्योगिक संस्थांचा निधी इतरत्र वळविण्यात येत असल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र इचलकरंजीत मोठय़ा प्रमाणावर संस्थांना मंजुरी दिल्याचे व निधीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्याची चौकशी सुरु असून या संस्थांना दुसरा हप्ता देण्याचे थांबविले आहे, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या निधीचा कोणत्या कामासाठी वापर केला त्याबदल्लचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १५१ संस्थांना समाज कल्याण आयुक्त आर.के. गायकवाड यांनी शासकीय निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल का करु नयेत अशा नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेचे व निधी वाटपाचे नवे धोरण जानेवारी २०१३ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे, असे शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.