इंदू मिलप्रकरणी सोनिया गांधींचे आश्वासन Print

खास प्रतिनिधी, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलची संपूर्ण जमीन मिळण्याबाबत आता संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत लक्ष घातले आहे. स्मारकासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे, असे त्यांनी लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष खासदार रामविलास पासवान यांना कळविले आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जमीन मिळावी, यासाठी गेल्या वर्षांभरापासून रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आंदोलन करीत आहेत.
 याच प्रश्नावर लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष खासदार रामविलास पासवान यांनी मुंबईचे अध्यक्ष मोहनराव आडसूळ व इतर पदाधिकाऱ्यांच्या समवेत सोनिया गांधी यांना निवेदन दिले होते. त्यावर सोनिया गांधी यांनी १६ ऑक्टोबरला पासवान यांना पत्र पाठविले असून, आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याचा विषय केंद्र व राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे कळविले आहे.