ठाणे जिल्ह्य़ात पाणीकपातीचे संकट Print

खास प्रतिनिधी, ठाणे
पुणे जिल्ह्य़ातील आंद्रा धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने यंदा ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांत मात्र ऐन सणासुदीच्या काळात पाणी कपात लागू होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठय़ाची तुलना करता आंद्रा धरणात यंदा ४० दशलक्ष घनमीटर कमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी ३०१ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. यंदा २६१ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. लघु पाटबंधारे खात्यास १५ जुलैपर्यंत हा जलसाठा पुरवावा लागतो. सध्या उपलब्ध जलसाठा आणि जुलै मध्यापर्यंतची गरज यात १९ टक्के तफावत असून ती भरून काढण्यासाठी प्रतिदिन १४ टक्के पाणी कपात करावी लागेल, असे लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांचे मत आहे.  ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना बारवी तसेच आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा बारवी भरले असले तरी आंद्रा भरलेले नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर या दोन नगरपालिका क्षेत्रांत तातडीने पाणी कपात लागू करावी लागणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी कपात लागू केली होती.