सहा महिने झाले तरी वेळुकरांच्या ‘पत्रकार परिषदे’ला मुहूर्त नाही! Print

प्रतिनिधी, मुंबई

एप्रिल-मे महिन्यात एकामागोमाग एक याप्रमाणे झालेल्या प्रश्नपत्रिकाफुटीच्या पाश्र्वभूमीवर दर एक-दीड महिन्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मुंबई विद्यापीठातील घडामोडींची माहिती देण्याचे कुलगुरू राजन वेळुकर यांचे आश्वासन हवेतच विरल्यात जमा आहे. कारण, या आश्वासनाला सहा महिने झाले तरी कुलगुरूंना पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यानच्या काळात जूनच्या पहिल्या आठवडय़ात वेळुकरांना पत्रकारांशी संवाद साधावासा वाटला. पण, त्यालाही पाश्र्वभूमी अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिकाफुटीचीच होती. तेव्हाही आपल्याला जे सांगायचे आहे ते वगळता अन्य प्रश्नांची उत्तरे टाळण्याकडेच कुलगुरूंचा कल होता. त्यानंतर आजतागायत विद्यापीठाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांपासून २०० कोटी रुपयांचे कन्व्हेन्शन पार्क उभारण्यापर्यंतच्या अनेक निर्णयांचा उल्लेख यासाठी करता येईल. पण, इतक्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची संधी असतानाही कुलगुरूंनी ही तसदी घेतलेली नाही.
टीवायबीकॉमचा ‘मार्केटिंग अ‍ॅण्ड ह्य़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट’ या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आपले डळमळते आसन सावरण्यासाठी ९ एप्रिलला कुलगुरूंनी कधी नव्हे ती पत्रकारांशी संवाद साधला होता. आदल्याच दिवशी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या निवासस्थानी त्यांचे सुपुत्र नीलेश राणे यांची वेळुकर यांनी घेतलेल्या भेटीची घटना ताजीच होती.
या पाश्र्वभूमीवर अचानक सायंकाळच्या सुमारास पत्रकारांना बोलावून कुलगुरूंनी आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोघम उत्तरे देऊन ‘वेळु’करांनी ‘वेळ’ मारून नेली असली तरी दर एक-दीड महिन्याने आपण पत्रकार परिषद बोलवून विद्यापीठातील घडामोडींची माहिती देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, सहा महिने झाले तरी कुलगुरूंकडून भेटीचे आवतण आलेले नाही.
केवळ सोयीच्याच प्रतिक्रियेसाठी (आणि पत्रकारांचेही) दूरध्वनी घेणारे कुलगुरू म्हणून वेळुकरांची ओळख आहे. ‘कुलगुरू हटाव’च्या काळात आपली खुर्ची सावरण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कुलगुरूंनी डॉ. नरेशचंद्र यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी नरेशचंद्रांशीच संवाद साधावा, असे कळविण्यात आले. परंतु, एखाद्या अडचणीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याबाबत नरेशचंद्र यांनी कुलगुरूंचा वारसा अगदी व्यवस्थित चालविला आहे. प्रश्न अडचणीचा असेल तर पाच मिनिटांनी माहिती घेऊन संपर्क साधतो, हे प्र-कुलगुरूंचे आश्वासन ‘सफळ संपूर्ण’ कधीच होत नाही, असा बहुतांश पत्रकारांचा अनुभव आहे.
दर महिन्याला पत्रकारांशी संवाद साधून विद्यापीठातील घडामोडींची माहिती देण्याची प्रथा माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या काळात सुरू झाली. त्यांच्या नंतरचे कुलगुरू डॉ. विजय खोले नियमित पत्रकार परिषद घेत नसले तरी पत्रकारांचे प्रश्न टाळत तरी नव्हते. पण, पत्रकारांना चार हात लांब ठेवण्याचा वेळुकरांचा खाक्या इतर अधिकाऱ्यांनाही अडचणीत टाकणारा ठरतो आहे.