उपनगरांत राजकीय पक्षांमध्ये ‘गरबा वॉर’ Print

रेश्मा शिवडेकर, मुंबई

लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता गृहीत धरून नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने रंगणाऱ्या गरब्याच्या माध्यमातून मतदारांना होता होईल तितके आकर्षित करण्याची चुरसच यंदा सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे. केंद्रातील अनिश्चित राजकीय वातावरण बघता हा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा नवरात्रौत्सव ठरण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये रंगलेले ‘गरबा वॉर’ सर्वसामान्यांच्या मात्र पथ्यावर पडले आहे. कारण, बॉलीवूड कलाकारांची उपस्थिती, अत्यंत भपकेबाज आणि व्यावसायिक पद्धतीने आयोजिलेल्या या कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्यांना पूर्णपणे मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. कुठल्याही व्यावसायिक गरब्याच्या सीझन पाससाठी तीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. मोफत प्रवेशामुळे गोरेगाव, मुलुंड, बोरिवली येथे दरवर्षी रंगणाऱ्या बहुचर्चित ‘गरबा शो’च्या हौशी प्रेक्षकांचे पायही तेथे वळू लागले आहेत. गोरेगाव स्पोर्टस क्लबवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक हिचा बहुचर्चित ‘गरबा शो’ रंगला आहे. या कार्यक्रमावर ठराविक राजकीय पक्षाची छाप नाही. पण, या कार्यक्रमाइतकाच डामडौल असलेला भव्य गरबा गोरेगावच्याच शहाजी राजे क्रीडा मैदानावर आयोजिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने होणारा हा गरबा नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस रंगेल. आतापर्यंत गुजराती-हिंदी गाण्यांवर ढोलना-ढोलनीचे पाय थिरकत असत. परंतु, पांडुरंग वाडी, जयकर स्मृती हा मराठीबहुल भाग लक्षात घेऊन यंदा संदेश उमप, आदर्श शिंदे या मराठमोळ्या कलाकारांना येथे पाचारण करण्यात आले आहे. यावर्षीचे आमचे वादकही मराठमोळेच असणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले. स्थानिक संस्था आणि सोसायटय़ांच्या माध्यमातून या गरब्याचे मोफत पास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या गरब्यात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात लाऊड स्पीकर चालतात, अशा तक्रारी गेल्या वर्षी स्थानिक नागरिकांनी करूनही वनराई पोलिसांनी त्यावर कारवाई न केल्याचे बोलले जाते. बोरिवलीत कोरा केंद्र येथे केबलचालक आणि राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते गणेश नायडू यांच्या पुढाकाराने भव्य गरब्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला नामवंत हिंदी कलावंतांबरोबच राष्ट्रवादी पक्षाचे नेतेही हजेरी लावत असतात. यंदा नायडू यांच्या या गरब्याला बोरिवलीच्याच एकता ग्राऊंडवर रंगणाऱ्या दांडियाची ‘टसन’ आहे. कारण, एकता ग्राऊंडवरील कार्यक्रमासाठी खुद्द  काँग्रेसचे खासदार संजय निरूपम आणि स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे.शेट्टी यांच्या पुढाकाराने गेली दोन वर्षे येथे गरबा रंगतो आहे. परंतु, यंदा या कार्यक्रमाचा डामडौल काही औरच आहे. सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी आतापर्यंत सोहैल खान, नगमा या कलाकारांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन या गरब्याला दर दिवशी ८ ते ९ हजार गरबाप्रेमी हजेरी लावत आहेत. सुनील शेट्टी, संजय दत्त आदी बॉलीवूड कलाकार तसेच मुख्यमंत्र्यापासून काँग्रेसचे लहानमोठे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.