वाढत्या वीज दरामुळे उद्योजक आक्रमक Print

राज्यभरातील कारखाने २५ ऑक्टोबरला बंद
खास प्रतिनिधी
ठाणे
वीज दरवाढीमुळे उद्योजकांचे व्यवसायाचे गणित बिघडले आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेल्या उद्योजकांनी  येत्या २५ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील औद्योगिक विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   महाराष्ट्रातील वीज दर देशभरात सर्वाधिक आहेत. गेल्या तीन वर्षांत एकूण १२ वेळा वीज दरवाढ झाली. या दरवाढीमुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले  आहे यासंदर्भात येथील चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अप्पा खांबेटे यांच्या उपस्थितीत टिसा हाऊसमध्ये राज्यभरातील उद्योजकांच्या प्रतिनिधींची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, जळगाव आदी राज्यांतील कारखानदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऊर्जातज्ज्ञ डॉ. अशोक पेंडसे आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी सभेत मार्गदर्शन केले. सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी एक दिवस कारखाने बंद ठेवण्याबरोबरच वाढीव वीज बिले न भरण्याचाही निर्णय या सभेत घेण्यात आला.