‘उपनगरातील वाहतूक समस्येवर उपाय शोधा’ Print

प्रतिनिधी
मुंबई
बोरिवलीसह पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीबाबत अनेक तक्रारी असून लोकांच्या तक्रारींचे निवेदन उच्चाधिकार समितीपुढे मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. अॅड्. रचना चव्हाण यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
मुंबईतील वाहतूक समस्येबाबत यापूर्वीच दाखल जनहित याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. बोरिवली आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्थेबाबतच्या लोकांच्या समस्येचे निवेदन पोलीस आयुक्तांनी या समितीसमोर सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने समितीलाही लोकांनी निवेदनाद्वारे केलेल्या वाहतूक समस्येचा अभ्यास करून त्याबाबतच्या उपाययोजनेचा आराखडा १ नोव्हेंबपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.