वाडिया रुग्णालयातून १ दिवसाचे अर्भक चोरीला Print

प्रतिनिधी , मुंबई
बाळाला पळविणाऱ्या महिलेचे रेखाचित्र आणि अर्भक़

परळच्या वाडिया रुग्णालयातून बुधवारी संध्याकाळी एक दिवसाचे नवजात अर्भक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये भगव्या रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेने या बाळाची चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र वाडिया रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महिलेचा शोध घेणे आव्हानात्मक आहे.
बोरिवलीमधील गोराई येथील रहिवासी जास्मिन नाईक (२८) यांना बाळंतपणासाठी सोमवारी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांनी मुलाला जन्म दिला. जास्मिन यांचे पती देवराज नाईक बुधवारी दुपारी साडेतीन वाजता मुलाला पाहायला आले आणि काही वेळाने निघून गेले. त्यानंतर बाळासोबत जास्मिन आणि तिची आई होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास डॉक्टरांनी जास्मिन यांना थोडे चालयला सांगितले. त्यामुळे त्या आपल्या आईसोबत वॉर्डमध्ये काही अंतर चालत असताना गर्दीतून आलेल्या एका महिलेने त्यांचे बाळ पळवून नेले. बाळ जागेवर नसल्याचे लक्षात येताच रुग्णालयाच्या आवारात सदर महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती महिला गर्दीत नाहीशी झाली.
दरम्यान, या महिलेने काळ्या ठिपक्यांची भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. तसचे ती वयाने पंचवीशीची असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दिली. वर्णनावरून पोलिसांनी या महिलेचे रेखाचित्र तयार केले आहे.