‘तुकाराम ते तुकाराम’ : भारतीय चित्रपटाचे ‘शतसंवत्सर’! Print

प्रतिनिधी
मुंबई
भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्या घटनेपासूनच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा वैशिष्टय़पूर्ण आढावा घेणारा तुकाराम ते तुकाराम हा कार्यक्रम येत्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.  
फाळके, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुधीर फडके, सी. रामचंद्र, वसंत देसाई अशा अनेक मराठी व्यक्तींनी आपले कर्तृत्व अगदी मूकपटांच्या जमान्यापासून ते मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रात गाजविले. त्याबरोबरच भारतीय चित्रपट क्षेत्रालाही उंची प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे काम अनेकांनी केले आहे. या कामगिरीची दखल म्हणून त्यांना मानाचा मुजरा करून मराठी माणसाचे चित्रपटातील योगदान लोकांसमोर ठळकपणे आणावे यासाठीच ‘तुकाराम ते तुकाराम’ या कार्यक्रम साकारण्याचे ‘सीबीडी फाऊण्डेशन’ या संस्थेने ठरविले, अशी माहिती संस्थेचे राजीव दोंदे यांनी दिली.  
या कार्यक्रमासाठी अरूण पुराणिक यांनी संशोधन आणि संहितालेखन केले असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी केले आहे. संहितालेखनाचे रंगमचीय संहितेत रूपांतर नाटककार अरविंद औंधे यांनी केले आहे. संगीत संयोजन अविनाश-विश्वजित यांचे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता तुषार दळवी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून नेपथ्याची जबाबदारी प्रसाद वालावलकर तर प्रकाशयोजनेची जबाबदारी भूषण देसाई यांनी सांभाळली आहे. आशुतोष गोवारीकर, सुलोचनादीदी, श्रीधर फडके, फाळके यांचे नातू पुसाळकर आदी मान्यवरांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे.